Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

भादवणमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

Location: **उत्तूर ** | Published: **March 21, 2026**

भादवणमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

विकासाची सत्ता केंद्रे जनतेच्या दारापर्यंत पोहचवा ; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ .
-----------भादवणमध्ये नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार.
-----------
उत्तूर ता.२१
जिल्हा परिषद व पंचायत समिती ही गोरगरीब जनतेच्या सर्वांगीण विकासाची सत्ता केंद्रे आहेत. या दोन्ही सत्ताकेंद्रांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना जनतेच्या दारापर्यंत पोहचवा असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
भादवण( ता. आजरा) येथे उत्तूर जिल्हा परिषद मतदार संघ सदस्य शिरीष देसाई, पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघ सदस्य सुधीर देसाई, आजरा पंचायत समितीच्या सभापती जयश्री गाडे, उपसभापती यशोदाताई पवार आजरा पंचायत समितीचे सदस्य विकास चोथे यांच्या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात मंत्री श्री. मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले उत्तूर विभागामध्ये नव्याने १४ गावे समाविष्ट झाली. ज्या विश्वासाने आणि भावनेने या १४ गावानी साथ दिली त्या विश्वासाला सार्थ राहून या सर्व गावांचे प्रश्न आपल्याला भविष्यात सोडवायचे आहेत. या भागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यालय करावे आणि त्या कार्यालयाच्या माध्यमातून सेवाभावी पद्धतीने या सगळ्या गोरगरिबांच्या कल्याणाच्या योजना जनतेपर्यंत पोहचव्यात.मंत्री मुश्रीफ म्हणाले, सभापती व उपसभापती आपल्या दारी उपक्रमांचे आयोजन करावे. या नवीन पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांसमवेत मतदारसंघातील प्रत्येक गावनिहाय दौरा करावा. तेथील पाण्याचे, स्वच्छतेचे, शिक्षणाचे व विकासाचे प्रश्न समजावून घ्यावेत.यावेळी सभापती जयश्री गाडे, आजरा कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल फडके, माजी जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ तेली यांची भाषणे झाली.

यावेळी सतीश पाटील- गिजवणेकर, आजरा कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई, वसंतराव धुरे, काशिनाथ तेली, एम. के. देसाई, मारुती घोरपडे, दीपक देसाई, राजू मुरकुटे, सुधीर सावंत, दत्ता जाधव, संजय येजरे, इंद्रजीत गाडे, आनंदा कुंभार व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
विष्णू मुळीक यांनी स्वागत केले. बी. टी. जाधव यांनी प्रास्ताविक केले. गणपतराव सांगले यांनी सुत्रसंचालन केल सदाशिव पाटील यांनी आभार मानले.
...............
भादवण- नूतन पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभात बोलताना वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ .
---------
अशोक तोरस्कर, उत्तूर