Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

उत्तूर विद्यालयात एक मुठ धान्य अनाथांसाठी उपक्रमाला प्रतिसाद.

Location: **उत्तूर ** | Published: **March 5, 2026**

उत्तूर विद्यालयात एक मुठ धान्य अनाथांसाठी उपक्रमाला प्रतिसाद.

उत्तूर विद्यालयात एक मुठ धान्य अनाथांसाठी उपक्रमाला प्रतिसाद.
उतूर ता. ५
एक मूठ धान्य शिव संकल्प मोहिमेतून अन्नसुरक्षा आणि पोषणाचा मजबूत संदेश उत्तूर परिसरात सुरू असलेली एक मूठ धान्य शिव संकल्प ही मोहीम सध्या समाजातील एकजुटीचे आणि माणुसकीचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. अनाथ मुले आणि निराधार वयोवृद्ध यांच्या थाळीत पौष्टिक अन्न पोहोचावे या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला नागरिक, शैक्षणिक संस्था, युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे...मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात डाळी, मूग, मटकी, हरभरा यांसारखी प्रथिनयुक्त कडधान्ये जमा होत असून त्यासोबतच शेंगदाणे, गूळ आणि इतर जीवनावश्यक धान्यही संकलित केले जात आहे. कडधान्ये ही प्रथिनांचा उत्तम स्रोत मानली जातात. वाढत्या वयातील मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी त्यांचे विशेष महत्त्व आहे. त्याचप्रमाणे वयोवृद्धांच्या आरोग्यासाठी लोहयुक्त आणि तंतुमय आहार आवश्यक असतो. गुळामधील नैसर्गिक साखर आणि लोह शरीराला ऊर्जा देते, तर शेंगदाणे शरीराला आवश्यक पोषणमूल्ये पुरवतात. त्यामुळे या मोहिमेतून केवळ अन्नच नव्हे तर आरोग्यदायी पोषण देण्याचा प्रयत्न होत आहे.
सोशल मीडियावरील प्रसार आणि स्थानिक वर्तमानपत्रांमधील प्रसिद्धीमुळे या उपक्रमाची माहिती अल्पावधीतच सर्वदूर पोहोचली. परिणामी समाजातील विविध स्तरांमधून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. विशेषत परिसरातील शाळा व महाविद्यालयांनी सामाजिक बांधिलकी जपत भरघोस धान्य देऊन या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा सहभाग या मोहिमेला अधिक बळ देणारा ठरत आहे.
ही मोहीम समाजात ‘एक मूठ धान्य’ या साध्या पण प्रभावी संकल्पनेतून मोठा बदल घडवून आणण्याचा संदेश देत आहे. प्रत्येक व्यक्तीने आपल्या क्षमतेनुसार दिलेली छोटी मदतही एकत्र आल्यावर मोठ्या सामाजिक परिवर्तनाचे रूप घेऊ शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे ही मोहीम होय.
उत्तूर परिसरात सुरू झालेली ही चळवळ आता व्यापक सामाजिक उपक्रमाचे स्वरूप घेत असून समाजात पोषण, आरोग्य आणि मानवतेचा मजबूत पाया घालण्याचे कार्य करत आहे. सर्वांच्या सहकार्याने आणि सकारात्मक सहभागातून ही मोहीम अधिक व्यापक स्तरावर यशस्वी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
फोटो.
उत्तूर - उत्तूर विद्यालयात एक मुठ धान्य अनाथासाठी या उपक्रमाला प्रतिसाद देताना शिक्षक
---------
अशोक तोरस्कर,उत्तूर