Toraskar News Portal – **Latest & Trusted Local News**

संवेदनशील माणूस तयार करणे हेच साहित्याचे प्रयोजनः सदानंद पुंडपाळ

Location: **उत्तूर** | Published: **December 4, 2025**

संवेदनशील माणूस तयार करणे हेच साहित्याचे प्रयोजनः सदानंद पुंडपाळ



‘आज तंत्रज्ञानाने जग जवळ आणले, तरी माणूस माणसापासून दूर चाललाय. नाती महाग होऊ लागली आहेत. अशा वेळी संवेदनशीलता जागवून साने गुरुजींची खरा तो एकचि धर्म ही शिकवण अनुसरायला हवी,’ असे प्रतिपादन सदानंद पुंडपाळ यांनी केले . ते देवनार येथे बालकुमार साहित्य संमेलनात अध्यक्षपदावरून बोलताना केले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि देवनार येथील कुमुद विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय तिसरे बालकुमार साहित्य संमेलन झाले .
श्री पुंडपाळ पुढे म्हणाले ‘जुन्या काळात साक्षरतेचे प्रमाण कमी होते, तरी माणसे संस्कारी होती, संवेदनशील होती. आज त्याचीच वानवा जाणवत असून एखाद्याला झालेला अपघात पाहूनही लोक त्याला मदत न करता मोबाईवर फोटो काढून ते सोशल मीडियावर अपलोड करण्यात धन्यता मानत आहेत, हे त्यांचे वर्तन त्यांची संवेदनशीलता हरवल्याचे लक्षण आहे. यासाठी बालसाहित्याच्या माध्यमातून संवेदना जागवण्याचे काम करायला हवे,’ यावेळी संघाच्या कार्याध्यक्ष डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी साहित्य आणि संमेलनाच्या प्रयोजनाबद्दल मौलिक विचार मांडले. कोषाध्यक्ष आनंद बिर्जे यांनी साहित्य मनोरंजनाबरोबर प्रबोधन करते असे सांगितले. प्रा. प्रतिभा सराफ यांनी साहित्य संघाच्या कार्याचा आढावा घेतला. कुमुद मेमोरियल फंडच्या अध्यक्ष श्रीमती मीना पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ‘नोकरीच्या मागे न लागता सुप्त गुणांना वाव देऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात उतरावे’ असे संमेलनाच्या उद्घाटक अलबत्या गलबत्या फेम अभिनेत्री श्रध्दा हांडे यांनी सांगितले.
सकाळी श्री. पुंडपाळ, प्रा. प्रतिभा सराफ, समन्वयक साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकार एकनाथ आव्हाड, श्रीमती प्रतिभा बिस्वास यांच्याहस्ते ग्रंथपूजनाने व ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरवात झाली. यावेळी लेझिम आणि ढोल ताशाच्या गजरात ग्रंथदिडी काढण्यात आली. मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वतीच्या प्रतिमापूजनाने संमेलनाची सुरवात झाली. ग्रंथभेट देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दिवसभरात मुलांची मुलाखत, कथाकथन व कवीसंमेलन अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संमेलनाला विद्यार्थी, शिक्षक व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
फोटो.
देवनार -अध्यक्षीय भाषण करताना श्री. पुंडपाळ. सोबत आनंद बिर्जे, डॉ. उज्ज्वला मेहेंदळे, श्रद्धा हांडे, मीना पाटील, रश्मी गायकवाड